अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातून बेकायदेशीर पद्धतीने 25 टन तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलीस पथकाने पकडला आहे. हा तांदूळ शालेय पोषण आहाराचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने हा ट्रक खडकी पुलावर मंगळवारी रात्री पकडला.
बार्शीटाकळी येथून (एमएच 35 के 3928) हा ट्रक 500 कट्टे तांदूळ घेऊन अकोल्याकडे येत होता. हा ट्रक शहर उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने खडकी पुलावर अडविला. ट्रक मध्ये 500 कट्टे तांदूळ असल्याची माहिती चालकाने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तांदूळ वाहतुकीची कागदपत्रे मागितली. चालकाकडे दुर्गा ट्रेडर्स आणि वजन काट्याची पावती होती. त्यामुळे पोलिसांची शंका बळावली. त्यांनी हा ट्रक खदान पोलीस ठाण्यात उभा केला. त्यांनतर पुढील कारवाईसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती दिली. ते रात्री आले नाहीत. त्यामुळे पोलिसांना पुढील कारवाई करता आली नाही. दरम्यान, पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेक राशन माफिया ठाण्यात आले. त्यांनी प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न केला. अजून यामध्ये कुठलीही कारवाई झाली नसून हा तांदूळ शालेय पोषण आहाराचा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे यांच्या पथकाने केली.