अकोला - मागील एका महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या १२०० बालकांपैकी २३ बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयात १७ बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित ६ बालकांचा 'डिस्चार्ज' दिल्यानंतर मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाला भेट देऊन तपास करणार आहेत.
अकोला जिल्ह्यात जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील महिला प्रसुतीसाठी येतात. मागील एका महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात १२०० प्रसुती झाल्या. यामध्ये प्रसुती झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्यापैकी ६ बालकांचा मृत्यू झाला. तर रुग्णालयात उपचारादरम्यान १७ बालकांचा मृत्यू झाला. याची नोंद आरोग्य विभागात करण्यात आली आहे.
दरम्यान, या २३ बालकांच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दिली. घरी मृत्यू झालेल्या सहाही बालकांच्या पालकांच्या भेटी घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन या मृत्यूच्या संदर्भात विचारणा केली आहे. तसेच या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरोदर माता व नवजात जन्मलेल्या बालकांना मिळावा, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.