अकोला - सर्व सामान्य जनतेच्या सोयीकरिता महाराष्ट्र शासनाने १०८ रुग्ण सेवा गाडी सुरू केली. परंतु, अलीकडे या रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. तर काही रुग्णवाहिका भंगार अवस्थेत सेवा देत आहेत. परंतु, या रुग्णवाहिकानाही अखेरची घरघर लागली आहे. अशाच एका रुग्णवाहिकेतून एका 19 वर्षीय रुग्णाला अकोटमधून अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तातडीने उपचारासाठी नेत असताना वाटेतच रुग्णवाहिकेचे मागील चाक पंक्चर झाले. त्या रुग्णाचा रस्त्यात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची घटना पळसोड फाट्यावर शुक्रवारी दुपारी घडली. रोशन पळसपगार असे मृत युवकाचे नाव आहे.
अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रोशन निरंजन पळसपगार याची प्रकृती अतिशय खराब होती. त्याला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार 108 रुग्णवाहिकेतून त्याला अकोला येथे नेट असताना पळसोद फाट्यावर रुग्णवाहिकेचे मागील चाक पंक्चर झाला. विशेष म्हणजे, या रुग्णवाहिकेत दुसरे चाक (स्टेपनी) ही नव्हती. शेवटी रुग्णवाहिकेचा चालक हा मागील चाक काढून ते दुरुस्त करून आणण्यासाठी चोहोटा बाजार या गावात गेला. तो परत येईपर्यंत रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. या प्रकारामुळे नातेवाईकांनी तिथेच हंबरडा फोडला.
विशेष म्हणजे, रुग्णवाहिका पंक्चर झाल्याने रुग्णवाहिकेचा चालक याने अकोट येथून दुसरी रुग्णवाहिका बोलावली. परंतु, तिला यायला तब्बल दीड ते दोन तास लागले. ती रुग्णवाहिका आली. परंतु, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता. अकोट अकोला मार्ग गेल्या तीन ते चार वर्षांपासून बनविण्यात येत आहे. परंतु, तो अद्यापही पूर्ण झालेला नाही. बरेच कंत्राटदार या रस्ताचे अर्धवट सोडून गेले आहेत. कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्यामुळे वाहतूक सुरळीत होत नाही. या रस्त्यामुळे अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तरीही प्रशासनाकडून अद्यापही या रस्त्याच्या पूर्णत्वेबाबत कुठलाही पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे.