अकोला - शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यामधून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. गुरुवारी तब्बल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ वर पोहोचली आहे. त्यामुळे अकोलेकरांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी एकूण ४१ जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचा आकडा वाढत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे परिश्रम आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी देखील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०७ वर -
कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २०७ वर पोहोचला आहे. या रुग्णांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यासोबतच दोन सफाई कामगार आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या दहा रुग्णांपैकी तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपुरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. त्यात सात पुरुष आणि तीन महिला आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी आणि परिचारिका कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश येत असून कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अकोल्यात कोरोनाची सद्यस्थिती -
- एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २०७
- मृत - १५
- डिस्चार्ज ७२
- उपचार सुरू असलेले रुग्ण - १२०