शिर्डी (अहमदनगर) - आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे अनेक महादेव मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता आले नाही. शिर्डीच्या साई मंदीरातही भक्तांना प्रवेश नाही. मात्र, परंपरेप्रमाणे साईबाबांच्या मुर्तीला बेलपत्र आणि रुद्राक्षाची माळ घालण्यात आली होती. प्रथेप्रमाणे साईबाबांच्या समाधीजवळ महादेव यांच्या प्रतिमेचे पुजन साई संस्थानच्यावतीने करण्यात आले.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त साईबाबा संस्थानच्यावतीने मंदिरात विविध विधिवत धर्मिक कार्यक्रम करण्यात आला. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने साईबाबांच्या समाधीसमोर महादेव यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. साईबाबांच्या मूर्तीला आणि समाधीवर बेलांच्या पानांचा हार, पुष्पहार तसेच रुद्राक्षाची माळ घालण्यात आला. साईबाबा संस्थानच्यावतीने पुजारी यांनी शिव स्तोत्राचे वाचन केले. भोलेनाथ व साईबाबांना नैवेद्य ठेवण्यात आला. तसेच साईबाबांना आज मुकुट व इतर अलंकार परिधान करण्यात आले होते.
दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या 17 मार्चपासून साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. भाविकांनी घरीच साईबाबांचे नामस्मरण करण्याचे आहवान साई संस्थानच्यावतीने करण्यात आले.