अहमदनगर - राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढत आहे. अशातच आज (गुरुवारी) पहाटे तीनच्या सुमारास अहमदनगर महानगरपालिका विभागाच्या जंतुनाशक फवारणी पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यात सुरेश वाघ आणि आदिनाथ भोस हे दोन सॅनिटर कर्मचारी जखमी झाले आहेत. नागापूर-बोल्हेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला. यामध्ये स्थानिक नगरसेविका रिटा भाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य निलेश भाकरे आणि त्याच्या 7 ते 8 साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या घटनेमुळे घाबरलेल्या जंतुनाशक फवारणी पथकाने आपले काम बंद केले आहे. आम्ही सांगू त्या पद्धतीनेच फवारणी करा, असा आग्रह नगरसेविकेच्या नातेवाईकांचा होता. मात्र, कर्मचारी नियमानुसार फवारणी करत असल्याने हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यापुढे पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय कर्मचारी काम करणार नाहीत, असा पवित्रा कामगार संघटनेने घेतला आहे.
वारंवार पोलीस आणि जनतेतून हल्ले होताना असताना पुरेशा सुरक्षा सुविधा उपलब्ध नाहीत. याची तक्रार मनपा आयुक्तांकडे करूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप कामगार संघटनेने केला आहे. तर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना पोलीस-प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असे आवाहन कामगार नेते अनंत लोखंडे यांनी केले आहे.