अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील वसंतराव निंभोरे यांचे पुत्र किरण आणि येळपणे येथील वाल्मिकी डफळ यांची पोलीस उपनिरीक्षक असलेली कन्या राणी यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच ठरला होता. 27 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. अशात आता या जोडप्याने आई वडिलांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत लग्नगाठ बांधली.
नातेवाईकांनी युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातूनच ऑनलाईन पद्धतीने या विवाह सोहळ्यास हजेरी लावली आणि वधूवरांना आशिर्वाद दिले. या आगळ्या वेगळ्या विवाहाचे फेसबुक तसेच युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. यामुळे, ठरल्याप्रमाणे वधू-वर नियोजीत वेळी विवाहबंधनात अडकले. या लग्नास सुमारे दीड हजार नातेवाईक, मित्र, आणि सहकारी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली.