अहमदनगर - जामखेड तालुक्यातील खर्डा येथील उच्च शिक्षित युवक सुजित अनिल चव्हाण (२४) याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याला उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र टाकसाळ यांनी सदर युवक मृत झाल्याचे सांगितले. यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की करत रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र नारायणराव टाकसाळ यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी दवाखान्यात रुग्ण तपासणीसाठी आला. सकाळी साडेअकरा वाजता काही लोक स्ट्रेचरवर त्याला घेऊन आले आणि रुग्णाला तत्काळ तपासा, त्याने फाशी घेतल्याचे सांगितले. सदर रुग्णाची तपासणी केली असता, तो मृत असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी तसे नातेवाईकांना सांगितले. युवकाचे नाव विचारले असता त्यांनी सुजीत अनिल चव्हाण असे सांगितले, असे फिर्यादी रवींद्र नारायणराव टाकसाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा... आमची बांधिलकी जनतेशी... कधी 'सिल्व्हर ओक' तर, कधी 'मातोश्री'वर अस्वस्थ येरझारा घालत नाही!
यानंतर टाकसाळ यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांना मोबाइलवरून माहिती दिली. सदर युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी सांगितले. या दरम्यानच्या काळात मृत युवकाचे नातेवाईक सुरज विलास पवार, सागर धुलचंद पवार, अभिजित अनिल पवार, निवृत्ती गोरख चव्हाण, निरज वसंत कसबे आणि इतर तीन लोकांनी दवाखान्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कक्ष, इंजेक्शन कक्ष, स्टाफ कक्ष, औषधाची रूम यांचे दरवाजे तोडले आणि काचा फोडल्या. दवाखान्यात रुग्णांसाठी बसवलेले सॅनिटायझर मशिन फोडून अंदाजे सात हजार रुपयांची नुकसान केली आहे, असे फिर्यादी डॉ. रवींद्र नारायणराव टाकसाळ यांनी तक्रारीत सांगितले.
जामखेड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर तेथील परिस्थिती आटोक्यात आणली. मृत सुजित चव्हाण याने नुकतीच डि-फॉर्मसी पदवी घेतली होती. लॉकडाऊन काळात तो खर्डा येथे घरी आला होता.