अहमदनगर - आज सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षांच्या दुसऱ्या खेपेसाठी अध्यक्ष-उपाध्यक्षांसह विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे कागदी बळ दिसत असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे-पिचड यांनी आपापले पक्ष सोडून भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे प्रत्यक्षातील बलाबलाचे समीकरण पुरते बदलले आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्याने आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या नव्या समीकरणात आज पदाधिकारी निवडीत नेमके कोण बाजी मारणार? याबद्दल अनिश्चितता आहे.
हेही वाचा - फिजिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स विषयाची पुनर्परीक्षा १४ जानेवारी रोजी
महाविकास आघाडी आणि सोबत असलेले क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आणि शिवसेना कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले शंकरराव गडाख यांचे पाच सदस्य सोबत असल्याने बाळासाहेब थोरात यांचे पारडे मजबूत मानले जाते. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वर्चस्व ठेवून असलेले राधाकृष्ण विखे हे भाजपसोबत असल्याने ते चमत्कार घडवणार का? याचीच मोठी उत्सुकता असणार आहे. भाजप निष्ठावान नेत्यांमध्ये विखेंबद्दलची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे, या परिस्थितीत विखे यांनी भाजपचा उमेदवार निवडून आणून दाखवल्यास त्यांची प्रतिष्ठा राज्यस्तरावर पुर्नस्थापित होणार आहे. मात्र, विखेंच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न भाजपला असणार आहे आणि याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र, असे असले तरी ही लढाई थोरात विरुद्ध विखे अशीच असल्याने दोन्ही बाजूने आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी बाजी लावली जाणार आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा दुपारी साडेतीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम-
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ही निवडणूक आज ३१ डिसेंबर रोजी होत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या देखरेखीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. ३१ तारखेस सकाळी ११ ते १ या वेळेत अर्ज भरण्यात येतील. त्यानंतर माघार, छाननी आणि आवश्कता भासल्यास निवडणूक ही प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.
हेही वाचा - नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू, राज्य सरकारची परवानगी
महाविकास आघाडीकडून राजश्री घुले मैदानात -
सध्या काँग्रेसच्या शालिनी राधाकृष्ण विखे या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादीकडून सध्या उपाध्यक्षा असलेल्या राजश्री घुले यांचे नाव आता महाविकास आघाडीकडून आघाडीवर आहे. कारण, त्यांचे पती माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विधानसभेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार येण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शिवाय माजी आमदार नरेंद्र घुले यांनीही जोमाने काम केले. घुले कुटुंबीयांनी विधानसभेची उमेदवारी न घेता पक्षाचे काम केले. त्यामुळे राजश्री घुले याच दावेदार आहेत. याच पक्षातील दुसऱ्या दावेदार जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रभावती ढाकणे यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. भाजपकडून उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहे. शालिनी विखेंनाच उमेदवारी देणार की, मूळ भाजपकडून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळणार, याचा उलगडा अकरा वाजल्यानंतर होणार आहे.
कागदावरील पक्षीय बलाबल-
- एकूण सदस्य संख्या - ७३ (एक जागा रिक्त त्यामुळे ७२)
- जादुई आकडा- ३७
- काँग्रेस २३ (थोरात-१०, विखे -१३)
- राष्ट्रवादी १९ (पक्ष-१४, पिचड गट-५)
- भाजप १४
- शिवसेना ७
- क्रांतिकारी शेतकरी पक्ष (गडाख) - ५
- महाआघाडी - २
- कम्युनिस्ट- १
- जनशक्ती आघाडी- १
- अपक्ष- १