अहमदनगर - कोपरगावातील 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, ती महिला राहत असलेला लक्ष्मीनगर परिसर सील करण्यात आला असून, आजपासून 14 एप्रिलपर्यंत कोपरगावमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचे आदेश तहसीलदारांनी लागू केले आहेत.
कोपरगावातील रुग्णाला ताप, खोकला असल्याने उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये या 60 वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना जिल्हा रुग्णालयात पाठवीण्यात आले असून, त्यांचीही कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.
कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर आता सील करण्यात आला आहे. कोपरगावमधील दवाखाने आणि मेडिकल सोडून कोणतेही व्यवसाय सुरू राहणार नाही. दरम्यान, आज आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात तातडीची बैठक घेऊन परीस्थितीचा आढावा जाणून घेतला. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जनतेला केले.
कोपरगावातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेने कुठेही प्रवास केला नसल्याची माहिती समोर येते आहे. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित तीन रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.