शिर्डी (अहमदनगर) - टिकटॉकवर बंदी आल्यामुळे शिर्डीतील लहानशा स्टारला मोठा धक्का बसला आहे. तिचे टिकटॉकवर १ लाख ५८ हजार फॉलोवर्स आणि ३५ लाख लाईक्स होते. मात्र, टिकटॉक बंद झाल्याची बातमी कळताच सर्व मेहनत वाया गेल्याचे तिला वाटू लागले. त्यामुळे ती आता आईच्या कुशीत धाय मोकलून रडतेय.
राशी टिकटॉकवरील एक्सप्रेशन क्वीन -
राशी शिंदे ही केवळ दहा वर्षांची असून ती आता पाचवीत गेली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिला टिकटॉकचे वेड लागले. सुरुवातील तिची आई अश्विनीने टिकटॉकवर अकाऊंट बनवले होते. आई व्हिडिओ बनवत असताना राशी पाहायची. कधी-कधी राशी देखील आईसोबत व्हिडिओ बनवत होती. राशीच्या चेहऱ्यावरील हावभाव व्हिव्हर्सला आवडू लागले. त्यामुळे राशीच्या व्हिडिओचे लाईक्स देखील वाढायला लागले. त्यामुळे राशीने टिकटॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसातच राशी टिकटॉकवर फेमस झाली असून तिचे साडेतीन लाखांच्या जवळपास व्हिव्हर्स आहेत. तिला एक्सप्रेशन क्विन म्हणून संबोधले जाऊ लागले. याबाबत सोमवारीच ईटीव्ही भारतने तिच्याशी संवाद साधला होता. मात्र, सोमवारी रात्री केंद्र सरकारने चीनच्या ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. ही बातमी राशीला कळताच ती रडायला लागली. मला स्टार बनायचे आहे. त्यासाठी मी मेहनत केली. मात्र, आतापर्यंतची माझी सर्व मेहनत वाया गेली, असे म्हणत ती आईच्या कुशीत रात्रभर रडत होती. त्यानंतर तिच्या आई-बाबांनी तिची समजून काढली. त्यामुळे आता ती थोडीफार सावरली आहे. आता टिकटॉकच्या जागी कुठलेही अॅप आले, तर त्यावरून व्हिडिओ बनवणार. त्यासाठी मेहनत करणार असल्याचे ती सांगतेय.
सुरुवातीला नातेवाईकांकडून झाला होता विरोध -
राशीची आई मूळची शिर्डीची आहे. सर्वसामान्य कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर अश्विनी ही कोपरगावला स्थायिक झाली. पुण्याला एका लग्नात काही मुली टिकटॉक करताना पाहून अश्विनीनेही टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला समाजातून, नातेवाईकांकडून व्हिडिओ बनवू नको सांगीतल गेलं. मात्र, अश्विनीला तिच्या पतीने आणि सासूने साथ दिली. त्यानंतर तिच्या मुलीत गुण पाहून आता अश्विनी ही राशीची आई म्हणून ओळखल जावू लागली असून त्यांच्या व्हिडीओला साडेतीन लाखांपर्यंत व्हिव्हर्स आहेत.
शाळा, शिकवणी, अभ्यास आटोपून बनवायची टिकटॉक व्हिडिओ -
राशी सध्या कोपरगावतील एका खासगी शाळेत पाचवीत शिकते. शिक्षणात लक्ष देते. दररोज शाळा, शिकवणी, अभ्यास झाल्यानंतर वेळ मिळाला तर टिकटॉक व्हिडिओ करतेय. रविवारी सुट्टी असल्याने ती आपल्या कुटुंबीयांसोबत आणि इतर कलाकारांसोबत टिकटॉक व्हिडिओ आवर्जुन बनवत होती.