अहमदनगर - परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आल्याने जामखेडमधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आठ झाली आहे. तर, यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी एकूण २८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित माहिती दिलीय.
जामखेडमधील मशिदीमध्ये आयव्हरी कोस्ट येथील व्यक्ती थांबली होती. तसेच एक व्यक्ती फ्रान्सची होती. त्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील लोकांसाठी शोधमोहीम राबवून जिल्हा रूग्णालयात आणले होते. त्यांचे नमुने पुण्याला पाठववण्यात आले. यामध्ये ३१ जणांची तपासणी करण्यात आली. या लोकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल अडीच हजार जणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. काहींवर पाळत ठेवली आहे. जामखेडचा प्रकार समोर आलेला असतानाच रात्री नेवाशाच्या मशिदीत वास्तव्यास असलेले दहाजण सापडले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचा पोलीस तपास घेत आहेत. या सर्वांची तपासणी केली जाणार आहे.