शिर्डी : समृद्धी महामार्गावर आयशरला मागून क्रूझर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पती पत्नीसह दीड वर्षाची मुलगी ठार झाली. ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात घडली. संतोष अशोक राठोड (35) त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड (29) आणि मुलगी अवनी संतोष राठोड दीड वर्ष अशी या अपघातात ठार झालेल्या कुटुंबियांची नावे आहेत. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू : क्रूझरने आयशरला दिलेल्या धडकेत संतोष अशोक राठोड त्यांची पत्नी वर्षा संतोष राठोड आणि मुलगी अवनी संतोष राठोड हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात संतोष राठोड यांचा पाच वर्षाचा मुलगा अर्णव हा देखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असून इतर पाच ते सहा जखमींवर कोपरगावच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
लग्नावरुन परत जाताना काळाचा घाला : पालघर जिल्ह्यातील विरार येथील संतोष राठोड हे मूळचे मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील रहिवाशी आहेत. संतोष राठोड आपल्या परिवारासह लहान भाऊ कृष्णाच्या लग्नासाठी जालना जिल्ह्यातील मूळगावी आले होते. 26 जूनला कृष्णा राठोड यांचे जालन्याजवळील एका गावात लग्न झाले होते. लग्नानंतर संतोष राठोड 29 जूनला आपल्या परिवारासह क्रूझर वाहनाने रात्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाले होते.
आयशरला धडकली क्रूझर : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आयशर कार पोहोचल्यानंतर तेथून जाणाऱ्या आयशर टेम्पो क्र. एमएच 20 सिटी 6656 याला क्रूझर जीप क्र. एमएच 22 एच 2523 ने मागून जोराची धडक दिली. या अपघातात लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला तर क्रूझर चालकासह 5 ते 6 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान आयशर चालकाने क्रूझर जीप चालकाविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
नवदाम्पत्य गंभीर जखमी : लग्न होऊन दोनच दिवस झालेल्या कृष्णा राठोड (27) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (19) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. मृत संतोषची आई बताबाई अशोक राठोड (65) यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -