अहमदनगर - गेल्या दोन महिन्यांपासून नगर जिल्ह्याच्या पाथर्डीत तसेच जिल्हसीमेवर लागून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी गावानजीक शेरी मळ्यात एक नर जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे एकट्या पाथर्डी तालुक्यात तीन बिबटे वनविभागाने आतापर्यंत जेरबंद केले आहेत.
शेरी मळ्यात वनविभागाने दोन पिंजरे लावले होते. त्यात बिबट्याला अडकवण्यासाठी शेळी ठेवण्यात आली होती. भक्ष्याच्या आशेने बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्यात तो जेरबंद झाला. ही बाब ग्रामस्थ आणि वनविभागाच्या लक्षत येताच या ठिकाणी स्थानिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे बिबट्या बिथरला आणि मोठं-मोठ्या डरकाळ्या फोडू लागला. वनविभागाचे अधिकारी येताच बिबट्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला नगर जिल्हा वनविभागात हलवण्यात आले.
वनविभाग कार्यरत-
मुंजोबा वस्तीवरील सुखदेव मरकड यांच्या वस्तीवर आणि पानतासवाडी-घाटशिरस रस्त्यावर चैतन्य नगर येथे खलील दाऊबा शेख यांच्या पाळीव कुत्र्याचा फडशा बिबट्याने पाडला होता, त्यामुळे ग्रामस्थ दहशतीमध्ये होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या हालचालींचे ठसे शोधत त्या दृष्टीने दोन पिंजरे शेरी मळ्यात भक्षासह लावले होते, त्यात हा तिसरा बिबट्या अलगद सापडला आहे. याबाबत नागरिकांत समाधान असले तरी तालुक्यात अजून किती बिबटे मोकाट आहेत याबाबत नेमकी माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. याबाबत वनविभागाने ग्रामस्थांना सुरक्षेच्या विविध सूचना दिलेल्या आहेत.
नगर-बीड हद्दीवरील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत-
आमदारा येथील श्रेया साळवे आणि पानतासवाडी येथील सार्थक बुधवन्त या दोन चिमुरड्यांसह अनेक पाळीव प्राणी बिबट्याने आतापर्यंत टिपले आहेत. आष्टी तालुक्यातही काही बळी गेलेले आहेत. यामुळे या भागात बिबट्याची मोठी दहशत असल्याने नागरिक भयभीत आहेत. त्यात जिल्हासीमेवर लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातपण बिबट्याचा धुमाकूळ असल्याने या परिसरात वनविभागाने मोठ्या संख्येने पिंजरे लावले आहेत. तर बिबट्याच्या भीतीने नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. नागरिकांनी जागरूक राहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
हेही वाचा - कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समिती संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा
हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांचे ऐकणार का? आजच्या पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात