शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यातील चितळी येथील बी. जे. पेट्रोल पंपावरील रक्कम महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भरणा करण्यासाठी कर्मचारी निघाला होता. त्याच्या हातातील बॅग हिसकावून पळालेल्या चोरट्यांचा पाठलाग करून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण व श्रीरामपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातल्या चितळी येथील बी.जे.पेट्रोल पंपाचे मॅनेजर साळुंके हे 1 लाख 68 हजार रुपये बँकेत भरण्यासाठी निघाले होते. रस्त्यात चितळी डिस्टीलरीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हाताला हिसका देऊन पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. त्यावेळी साळुंके यांनी पुणतांब्याच्या दिशेने चोरट्यांचा पाठलाग केला. गावकऱ्यांनी साळुंके यांची मदत केली. उसाच्या शेतात पळालेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी ऊसाच्या शेतीला घेराव घालत श्रीरामपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस नाईक अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पठाण हे काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी उसात शिरून या चोरांना ताब्यात घेतले असून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन चोरांविरोधात अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असून, हे तिघेही कोपरगाव आणि शिर्डी परिसरातील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.