अहमदनगर - जिल्हातील नेवासा तालुक्यात खोटे लग्न करून आर्थिक लूट करून नवर्या मुलीसह पोबारा करणारी सात जणांची टोळीच्या नेवासा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करून नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील नागापूर येथील चंद्रकांत रायभान शेजुळ यांच्या मुलासोबत अश्वीनी सचिन केदारे हिचे लग्न ठरले होते. लग्न ठरवताना तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांनी लग्न लावून देतो, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात मुलीचे आई-वडील व इतर नातेवाईक लग्नासाठी आले नसल्याने नवरदेवाचे वडील आणि नवरा मुलगा यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर लग्नासाठी आलेल्या तिघांनी नवरदेवास आमच्याबरोबर चार मुली आहेत. त्यापैकी एकीशी लग्न करुन घ्या, अन्यथा तुम्ही त्यांच्यावर अतिप्रसंग केला असे सांगू, गुपचूप लग्न लावून घ्या व आमची ठरलेली दोन लाख रुपये रक्कम द्या, अशी धमकी दिली. त्यानंतर नवरदेव आणि त्याच्या पित्याने नेवासा पोलीसाकडे धाव घेत लक्ष्मण मंजाबापू नवले, राजुदेवराव साळवे, मुनीरखान अमीरखान, अश्वीनी सचिन केदारे, मुमताज सलीम पटेल, शहनाज नाशीर शेख, स्नेहा गौतम मोरे या सात जणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सातही आरोपींविरोधात भा.दं.वि.चे कलम 420, 389, 120(ब), 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत. दरम्यान, या सर्व आरोपींना अटक करून नेवासा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
हे ही वाचा - अण्णांनी गावालाच नव्हे तर माझ्यासह पंतप्रधानांनाही ग्रामविकासाचा मार्ग दाखविला - राज्यपाल