अहमदनगर: भरत तोडमल हा युक्रेनच्या चेर्नीव्हेस्टी शहरातील बोकोनेव्हिया युनिव्हर्सिटी मधे गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर (War situation in Ukraine) सर्व विद्यार्थी धास्तावले आहेत. नगर मधील पालकही चिंताग्रस्त झाले होते. नगरचा भरत तोडमल हा राजधानी पासून सहाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या चेर्नीव्हेस्टी शहरात होता. तसेच चेर्नीव्हेस्टी शहर रोमानियाच्या सरहद्दीपासून केवळ चाळीस किलोमीटर दूर आहे. याचाच फायदा विद्यार्थ्यांना झाला.भारतीय एम्बेसीने येथील विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सीमेवर सुरक्षित पोहचवले. रोमानिया मधील बुकारेस्ट येथील विमानतळावर भारतीय विमान मिशन गंगा मोहिमेअंतर्गत (through Mission Ganga) उपलब्ध करून ठेवण्यात आले होते. मिशन गंगाच्या पहिल्याच विमानात भरतचा नंबर लागला आणि तो मुंबईत आणि पुढे नगरला (The first student of the Nagar ) रविवारी रात्री पोहचला.
भरतच्या घरात आनंदाचा माहोल-
भरत घरी येताच त्याची सारखी वाट पाहणारे पालक, आप्त, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी त्याचे आनंदाने स्वागत केले. भरतच्या घरी तर सनसोहळ्याचे वातावरण झाले आहे. अनेकजण त्याला भेटायला येऊन तिथला अनुभव विचारत आहेत.
इतर मित्रांना पण लवकर आणा
भरतने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यावर तेथील वातावरण खूप भीतीदायक झाले आहेत. विशेष करून रशियाला लागून असलेले प्रांत आणि राजधानी किव्ह्ज मध्ये रशिया सातत्याने हवाई हल्ले करत आहेत. युक्रेनच्या विविध भागात भारतातील पाच ते सहा हजार विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना काही ठिकाणी तळघरात तर काहींना बंकर मधे ठेवण्यात आले आहे. भारत सरकारने या सर्वांना तातडीने भारतात आणणे गरजेचे आहे.
भारताच्या तटस्थ भूमिकेचा फटका
मिशन गंगाअंतर्गत नागरिक आणि विद्यार्थ्यांना परत आणले जात आहे. युक्रेनच्या पश्चिमेकडील देशातील बॉर्डरवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय एम्बेसी यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र भारताने युक्रेनला पाठिंबा न देता तटस्थ भूमिका घेत एक प्रकारे रशियाला मदत केल्याची भावना युक्रेन सैनिकात असून त्यामुळे परतणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी दुजाभाव करत मारहाण केली जात आहे. भारतात सुखरूप परतलेल्या भरतने याबद्दल नाराजी व्यक्त करत युक्रेनच्या सैन्याने असे न करता विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन केले आहे.
पालकांना आनंद आणि चिंताही
भरतचे आई-वडील आणि छोटा भाऊ भरत सुखरूप परतल्याबद्दल चिंतामुक्त झाले आहेत. युद्धाची बातमी एैकुन त्यांना रात्र-रात्र झोप येत नव्हती, आम्ही त्याच्या सतत संपर्कात होतो. मुलगा घरापासून सहा हजार किलोमीटररवर युद्धछायेत असल्याने खूप टेन्शन होते, मात्र मोदी सरकारने मिशन गंगा घोषित केल्यानंतर आमच्या नशिबाने भरतचा पहिल्याच फ्लाईट मध्ये नंबर लागला. ही माहिती आम्हाला कळताच आम्ही आनंदून गेलो, तो घरी येई पर्यंत आम्हाला त्याची खूप ओढ लागली होती. त्याला डोळ्यासमोर पाहताच आम्हाला आनंदाश्रू आवरले नाहीत, अशी भावना भरतची आई शीतल आणि वडील सोपान तोडमल यांनी व्यक्त केली.
देशातच का उच्च वैद्यकीय शिक्षण मिळत नाही-
स्थानिक नगरसेवकां सह अनेकांनी भरतच्या घरी जाऊन स्वागत केले. याबाबत बोलताना, आपल्या देशात वैद्यकीय शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने आणि तुलनात्मक वैद्यकीय शिक्षणाचा खर्च जास्त असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालक युक्रेन, रशिया या देशात मोठया संख्येने जातात. अशा परिस्थिती याची तीव्रता पाहता, आपल्याच देशात सर्व क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असणे गरजेचे झाले असल्याचे यानिमित्ताने पुढे आले असल्याचे मत व्यक्त होत आहे.