अहमदनगर - शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. नगर शहर आणि नगर तालुका ग्रामीण भागामध्ये राेज हजार ते बाराशेच्यावर रुग्णसमोर येत आहेत आणि मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महापालिकेने आज (रविवार) रात्री बारा वाजल्यापासून 10 मेपर्यंत पुढील सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. यामध्ये आरोग्यसुविधा सोडून फक्त दूध वितरण सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू असणार आहे. मात्र किराणा विक्री व भाजीपाला विक्री सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये शेतीमाल विक्रीला आणू नये, अन्यथा महानगरपालिकेच्यावतीने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेला आहे.
भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
शनिवारी रात्री महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सात दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे आज रविवारी सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये नागरिकांनी भाजीपाला बाजारात तसेच किराणा दुकानांमध्ये मोठी गर्दी केलेली दिसून आली. पुढील सात दिवस भाजीबाजार भरणार नसून त्याचबरोबर किराणा दुकाने बंद राहणार आहेत आणि नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. या सर्व कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नागरिकांनी रविवारी सकाळी बाहेर पडत भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर किराणा दुकानातही किराणा साहित्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. पेट्रोल पंपावर ही नागरिकांनी पेट्रोल भरून घेण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे.
जिल्ह्यात तेवीस हजार रुग्णांवर उपचार सुरू -
दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 हजार पार गेल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. सध्या तेवीस हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 2 हजार 30 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. नगर शहरात रोज सातशे ते आठशे रुग्ण त्याचबरोबर नगर तालुका ग्रामीण भागात तीनशे ते चारशे बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर हे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
अधिकारी-पदाधिकारी यांचा संयुक्त निर्णय -
कडक लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे, महापालिका दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान त्याचबरोबर कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली. पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी यावेळी सांगितले की, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, कोणीही व्यायामासाठी देखील बाहेर पडू नये. विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध -
एकूणच शहरांमध्ये आणि शहर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्या ही वाढत आहे. जिल्ह्यांमध्येही संगमनेर, राहाता आदी तालुक्यांमध्ये रुग्ण वाढीचा दर हा अजूनही जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाला आता नगर शहरासह जिल्ह्यातच कडक भूमिका घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण सुरसे यांनी दिली आहे.