अहमदनगर - तिकिटाचे सुट्टे पैसे देण्या-घेण्याच्या वादातून एका महिलेने संगमनेर आगारातील वाहक आदिनाथ कोंगे यांना मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या संगमनेर आगारातील कर्मचाऱ्यांनी अचानक आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
संगमनेर आगारातील एसटी बसेस गेल्या ३ तासांपासून बाहेर न पडल्याने प्रवासी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. संगमनेर-अकोले या एसटीने प्रवास करणाऱ्या एका महिलेने वाहकाला मारहाण केली, असा आरोप वाहकाने केला आहे. तर दुसरीकडे संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वाहकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी या वाहकाची तक्रार न घेतल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी डेपो मध्ये काम बंद आंदोलन केले.
हा गुन्हा खोटा असून महिलेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यामुळे गेल्या ३ तासांपासून एकही एसटी बस मार्गस्थ न झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.