शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या श्रीराम नवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार सर्व कार्यक्रम पार पडला.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वीणा, उपमुख्य कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी पोथी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. राम नाईक व डॉ.अविनाश जाधवर यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. सकाळी 6 वाजता संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांच्या पत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.
यानंतर सकाळी 9 वाजता संस्थानचे रविंद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते लेंडीबागेत साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन व व्दारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याची पुजा करण्यात आली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. दुपारी 12 वाजता कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरातील प्रवेशव्दार क्रमांक ०४ च्या समोर परभणी येथील जीवन कौशल्य आर्ट च्या १२ कलाकारांनी श्रीराम व श्री साईबाबा यांची भव्य अशी रांगोळी साकारली. या कलाकारांनी ३९x२४ अशी सुमारे ९०० चौ. फुट आकाराची व ०४x०३ आकाराच्या ०३ रांगोळ्या अशा एकुण ०४ रांगोळ्या साकारल्या. याकरीता ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे, सौ.संजना उमेश लकारे (ज्योती अरुण मेहेरे) कु.कांचन अनिल तळेकर, याकलाकारांनी सुमारे ४० तास परिश्रम घेतले. संस्थानच्या वतीने सर्व कलाकारांचा प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्सवाच्या निमित्ताने शिंगवे ता. कोपरगांव येथील निलेश नरोडे, मे. ओमसाई इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात देणगीस्वरुपात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर कर्नाटक राज्यातील हुबळी येथील दानशूर साईभक्त बी. एस. आमली यांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.