अहमदनगर - नगर तालुक्यातील चारा छावण्यावर बेशिस्तीचा कारभार व ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने चार छावण्यांवर कारवाई केली. परंतु प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घेऊन चारा छावण्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज नगर-पुणे महामार्गावर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सध्या नगर तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परस्थिती आहे. त्यामुळे छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. या छावण्या तत्काळ सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाच्या विविध पथकाने तपासणी करून जनावरांच्या संख्येत तफावत, अनियमितता आणि ढिसाळ व्यवस्थापनाचे कारण देत तालुक्यातील सारोळा कासार, अकोळनेर, नारायण डोहो, घोसपुरी या चारा छावण्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांची मान्यता रद्द केली. तपासणी करताना छावण्यात कोणत्या त्रुटी आढळून आल्या याची नोंद शेरे बुकात करणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांकडून तशी कोणतीही नोंद करण्यात आली नाही. तसेच छावण्यांवर कारवाई केल्याची माहिती चालकांना दिली गेली नाही. प्रशासनाने या छावण्यांवर एकतर्फी कारवाई केली कशी? छावण्यावर कारवाई करताना चालकांना आपली बाजू मांडण्याची संधी प्रशासनाने का दिली नाही ? असा प्रश्न संदेश कार्ले यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यामुळे नाईलाजाने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनामध्ये जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, अशोक झरेकर आदी उपस्थित होते. या आंदोलकांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. तसेच जोपर्यंत संबंधित चारा छावण्याची कारवाई मागे घेऊन त्या सुरू करण्याचा आदेश निघत नाही, तोपर्यंत जेलमध्ये किंवा छावणीवर उपोषण आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.