अहमदनगर - राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आज बहुमत ठराव 169 विरुद्ध शून्य मतांनी जिंकला. यानंतर अहमदनगर शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नगर-पुणे महामार्गावर शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडत आणि पेढे वाटून हा आनंद आणि जल्लोष करण्यात आला.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष गाडे यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आता सुटणार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, यात शंका नसल्याचे सांगितले. शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, बाळासाहेब बोराटे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.