शिर्डी - ठाकरे सरकारने अखेर लॉकडाऊनमध्ये बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शनिवारी घेतला आहे. दिवाळी पाडव्याला ही मंदिरे खुली करण्यात येणार आहेत. त्यानिर्णयानंतर शिर्डीचे साईबाबा मंदिर दीपावली पाडव्याच्या दिवशी साईबाबांच्या काकड आरतीपासुन भक्तांना दर्शनासाठी सुरू होणार आहे.
शिर्डीकरांना दर्शनासाठी प्रथम प्राधान्य-
उद्या काकड आरती नंतर सुरुवातीला दर्शनासाठी शिर्डीतील ग्रामस्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर बाहेरुन आलेल्या भक्तांना दर्शन दिले जाणार आहे. मात्र बाहेरुन येणाऱ्या भक्तांना साई संस्थानच्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन पध्दतीनेच आरती आणि दर्शनाच बुकींग करुनच यावे, त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही, अस अवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
तरच मिळणार दर्शन-
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमानुसारच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर भक्तांना सुलभ आणि सुरक्षीत दर्शन कसे देता येईल याची संपुर्ण तयारी साईबाबा संस्थानने केली आहे. सध्या दिवसभरात केवळ सहा हजार भक्तांनाच कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करत दर्शन दिले जाणार आहे. साईभक्ताला मंदिर परिसरातील दोन नंबर गेट मधुन प्रवेश दिला जाणार आहे. तेथुनच भक्तांना पाय धुण्याची व्यवस्था, तसेच भक्तांचे स्क्रीनिंग करणे सँनटायझेशन करणे आणि सुरक्षीत अंतर ठेवण्याचे सगळे नियम पाळले जाणार आहेत. शिर्डीत येवुनही भक्तांना दर्शनासाठी फ्री अथवा पेड पास घेता येणार आहे. मात्र त्या भक्ताला त्या दिवशी कोटा शिल्लक असेल तरच मिळु शकणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवासस्थान भोजनगृहही सुरू होणार-
शिर्डीत आलेल्या भक्ताला दर्शन रांगेत कोव्हिड सदृश्य लक्षणे आढळुून आल्यास, त्यांना शिर्डीतील कोव्हिड केअर सेटर मध्ये भरती केले जाणार आहे. साईबाबा संस्थान पन्नास टक्के क्षमतेने आपली निवास व्यवस्था सुरू करणार आहे. याच बरोबरीने योग्य क्षमतेत साई संस्थानच भोजन गृहही सुरू करण्यात येणार आहे. शिर्डी येणाऱ्या भक्तांनी नियोजनच करुनच यावे, अस आवाहन साई संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.