अहमदनगर - साईबाबांच्या मंदिर परिसरातील गुरुस्थानाजवळ सोडून दिलेल्या सहा महिन्यांच्या मुलीच्या संगोपन आणि शिक्षणासाठी शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांनी मदतीचे हात पुढे केले आहेत.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते 1 लाख रुपयाचा धनादेश तसेच 62 हजार 891 रुपयाची रोख रक्कम अहमदनगरमधील स्नेहालय या संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे यांच्याकडे सुपूर्त केली आहे.
दिनांक ३१ मे २०१९ रोजी गुरुस्थान मंदिराजवळ सहा महिन्याची मुलगी बेवारस स्थितीमध्ये आढळून आली होती. सदर मुलीस संस्थानच्या संरक्षण विभागामार्फत नियमानूसार शिर्डी पोलीस स्टेशनकडे देण्यात आले होते.
शिर्डी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील सामाजिक संस्था
स्नेहालयाकडे त्या मुलीला सोपवले होते. शिर्डी संस्थानातील कर्मचाऱयांनी मुलीच्या पुढील संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी संस्थानचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को.ऑप. सोसा. ली.शिर्डी यांना यथाशक्ती व ऐच्छिक स्वरुपात आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्वाच्या सहकार्याने 1 लाख 62 हजार 891 रुपये रक्कम जमा झाली. सदरची रक्कम ही सामाजीक संस्था स्नेहालय, अहमदनगर यांच्याकडे आज देण्यात आली आहे. तसेच सदरची रक्कम ही त्या मुलीच्या संगोपन आणि शिक्षणासाठीच वापरण्यात येणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले आहे.