अहमदनगर- कंकणाकृती सुर्यग्रहणामुळे आज सकाळी ८ ते ११ यावेळेत साई समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सदर कालावधीत मोफत बायोमॅट्रिक दर्शन पासेस काऊंटर आणि जनसंपर्क विभागाकडील सशुल्क व्हीआयपी दर्शन पासेस देणारे काऊंटर बंद राहणार आहे. अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
आज सकाळी ८.०५ ते सकाळी ११ याकाळात कंकणाकृती सुर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे श्री. साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. सकाळी ८.०५ वाजता समाधी मंदिरात मंत्रोपचार सुरू होईल. सकाळी ११ वाजता मंत्रोपचार संपल्यानंतर श्रींचे मंगलस्नान होऊन 'श्रींची शिरडी माझे पंढरपूर' आरती होईल. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाल्यानंतर साई दर्शन सुरू होईल. सदर ग्रहण काळात श्री. साईसत्यव्रत व अभिषेक पुजा बंद ठेवण्यात आल्यामुळे त्याकाळातील ऑनलाईन बुकिंग केलेल्या साईभक्तांकरिता सकाळी ७ ते ८ यावेळेत श्री. साईसत्यव्रत व अभिषेक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व साई भक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुगळीकर यांनी केले आहे.
हेही वाचा- शिर्डी साई बाबा मंदिरात नाताळ साजरा.. दिला सर्वधर्म समभावनेतेचा संदेश