शिर्डी (अहमदनगर) - साई मंदिरातील गाभारा, मंदिराचे पाचही प्रवेशद्वार आणि दर्शन रांगेतही एमएसएफचे जवान (Shirdi Sai Temple Security) सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. साई मंदिरासाठी ही अतिरिक्त सुरक्षा (MSF Security Sai Temple shirdi) व्यवस्था आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था लागु करण्यात आली आहे.
अशी आहे साई मंदिराची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा - साई मंदिराच्या सुरक्षेसाठी पूर्वीपासून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे शंभर पोलीसही तैनात आहेत. हे पोलीस साई मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था सांभाळतात. याबरोबर साई संस्थानचे कायम आणि कंत्राटी असे मिळून 750 सुरक्षारक्षकही सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असतात.
साई मंदिराला एमएसएफची सुरक्षा - आता साई मंदिरासाठी अतिरिक्त एमएसएफची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हे जवान दर्शन रांगेत भाविकांची तपासणी करण्याबरोबरच साई मंदिराच्या गाभाऱ्यातही तैनात असणार आहेत. एमएसएफचे 74 जवान साई मंदिर परिसरात आणि मंदिरातही तैनात असणार आहेत.
साई संस्थानला अतिरिक्त भार - एमएसएफच्या या 74 सुरक्षारक्षकांचा पगार, निवास आणि भोजन व्यवस्था साई संस्थानकडून करण्यात येणार आहे. त्यापोटी साई संस्थानला 21 लाख अतिरिक्त खर्च येणार आहे.
सीआयएसएफ संदर्भातली दाखल याचिका सध्या प्रलंबित आहे. या याचिकेला अधीन राहूनच एमएसएफची सुरक्षा व्यवस्थेचा करार करण्यात आला - पी शिवाशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान
सीआयएसएफची याचिका प्रलंबित - साई मंदिराला सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था देण्याबाबत औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल आहे. ती याचिका सध्या प्रलंबित आहे. या याचिकेला अधीन राहूनच एमएसएफची सुरक्षा व्यवस्थेचा करार करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - Donation To Sai Baba: म्हणून आंध्र प्रदेशच्या 'या' साईभक्ताने दिले तब्बल तेवीस लाख रुपयांचे दान