अहमदनगर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पुण्याला परत जात असताना पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी लंके कुटुंबीयांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचे स्वागत केले.
आमदार लंके राहतात शेतातील चाळीत -
पारनेर मतदारसंघात 2019 ला विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचा पराभव करून अशक्यप्राय असा विजय मिळवला होता. निलेश लंके आजही हंगा गावातील शेतातील चाळीत राहतात. त्यांचे वडील निवृत्त शिक्षक आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे लंकेचे घरातील वातावरण असते.
गडकरी आणि पवार एकाच मंचावर -
अहमदनगरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध मार्गांच्या कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात नितीन गडकरी आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते.
आमदार लंकेच्या घरी दिली सदिच्छा भेट -
रस्त्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपल्यानंतर पुण्याकडे परतत असताना शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर ते थेट लंके यांच्या हंगा गावी पोहचले. यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी लंके कुटुंबीयांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. तसेच लंके परिवारातील लहानग्यांसोबत शरद पवार यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.
हेही वाचा - मेहरबानी करून जीवनात कधीच कोर्टाची पायरी चढू नका, अजित पवारांचा मोलाचा सल्ला