अहमदनगर - आपल्या कृषीविषयक मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करत आहेत. याचे नियोजन करण्यासाठी आज (शुक्रवारी) राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने आंदोलनाचे स्वरूप ठरवण्यात येत असून कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये येऊन आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन करताना त्या ऐवजी आपापल्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
केंद्रीय नेते, भाजप नेते भेटीला
अण्णांनी आंदोलन करू नये, यासाठी आता केंद्र सरकार पातळीवर प्रयत्न सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारनंतर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी स्वतः अण्णांशी बोलण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन आदी नेते त्यांच्यासोबत आहेत. एकंदरीत केंद्र सरकारने अण्णांनी आंदोलन करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठीचा एक प्रस्ताव घेऊन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आज राळेगणसिद्धीमध्ये आलेले असून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सध्या बैठकीमध्ये सुरू आहे.
आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक नेते राळेगणसिद्धीमध्ये येऊन गेलेले असताना सर्वांनी भेटीत चर्चा केली. मात्र, आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे प्रत्येक वेळी अण्णांनी सांगितले आहे. त्यामुळे आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीमध्ये बोलणी करण्यासाठी आल्यानंतर अण्णांची भूमिका आंदोलनाबाबत काय असेल याबाबत सध्या उत्सुकता आहे.