अहमदनगर - नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सूचक-अनुमोदक म्हणून सामान्य शेतकऱ्यांना मान देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढण्यात आली. सोमवारी युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. आज त्यास उत्तर देताना आमदार संग्राम जगताप यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपणही या लढतीमध्येमध्ये तुल्यबळ असल्याचे दाखवून दिले. यावेळी बैलगाडी आणि विजय संकल्प रथात आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले आदी यावेळी उपस्थित होते. यानंतर शहरातील क्लेरा ब्रुस मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.
संग्राम जगताप २००९ मध्ये पहिल्यांदा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना महापौर पदाचा मानही मिळाला. २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा नगरसेवक झाले. तसेच त्यांना दुसऱ्यांदा महापौर पदाचा मान मिळाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी सलग ५ वेळा आमदार असलेले शिवसेनेचे अनिल राठोड आणि भाजप उमेदवार अॅड. अभय आगरकर यांचा पराभव केला होता.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश डावलण्याचे धारिष्ट त्या नगरसेवकांनी दाखवले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे जगताप अडचणीत आले होते. मात्र, जगताप हाच पक्ष मानणाऱ्या त्या नगरसवेकांना 'पक्ष नेतृत्वाने(सग्राम जगताप)' पुढच्या' संग्रामासाठी' अभय दिले आहे. आता हाच 'संग्राम' राष्ट्रवादीने लोकसभेच्या मैदानात उतरवला आहे. तोही मोठ्या साहेबांना कधी काळी राजकीय आणि न्यायलीयन कैचीत पकडणाऱ्या दिवंगत बाळासाहेब विखेंच्या नातवा विरोधात. आता सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यामधील लढत अधिक लक्षवेधी ठरलेली आहे.