अहमदनगर - आर्यन खान प्रकरणात पंचवीस कोटींचा व्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. याची पोलीस विभागामार्फत चौकशी करावी आणि जर या प्रकरणात ब्लॅकमेलिंग झाल्याचे चौकशीत पुढे आले तर एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. जामखेड इथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी नंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत पोलिसांना आदेश देऊन चौकशी केली पाहिजे
आर्यन खान अटक प्रकरणात पंच असलेल्या व्यक्तीनेच(प्रभाकर साईल) एफ़िडेवीट करून याबाबत माध्यमात माहिती दिली आहे. त्याच्याकडून काही कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या गेल्या आणि आपण समोरच डील सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत पोलिसांना आदेश देऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.
जातीयवादी पक्षांकडून काँग्रेस संपवण्याची भाषा-
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र आले आहेत असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले त्यांचा रोख हा जातीयवादी शक्तींबद्दल असावा. कारण काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला संपवणे म्हणजे सामान्य माणसांचा एक आधार संपवणे असे त्यांना म्हणायचे असावे असे स्पष्टीकरण तांबे यांनी दिले आहे.
केंद्रीय एजन्सीचा विरोधकांसाठी वापर हे खा. संजय काका पाटलांच्या विधानाने स्पष्ट-
खासदार संजय काका पाटील यांनी, मी भाजपचा खासदार असल्याने माझ्यामागे ईडी लागणार नाही वक्तव्य केले. त्यावर बोलताना तांबे म्हणाले, संजय काका पाटील हे मूळ काँग्रेसमच्या विचारांचे आहेत. त्यामुळे ते प्रामाणिकपणे तसे बोलले असतील. भाजप हे कितीही घाण कपडे स्वच्छ करण्याचे वाशिंग मशीन आहे. त्यामुळे जो कोणी तिकडे जाईल तो धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होतो. तसेच, ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआयच्या चौकशा होत नाहीत हेच संजय काकांच्या वक्तव्यावरून शिक्कामोर्तब होतय असही तांबे यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - नवाब मलिक म्हणाले 'फर्जिवाडा इथूनच सुरु होतो', समीर वानखेडेंची NDPS कोर्टात वादग्रस्त माहिती