शिर्डी(अहमदनगर) - साईबाबांचे वास्तव्य असणाऱया शिर्डीतील द्वारकामाई व चावडीत साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या देणगीतून नूतन मकरांना मार्बल बसवण्यात आले आहे. यासंदर्भातली माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली. द्वारकामाईतील धुनीजवळील मुख्य भाग, ओटा व पायऱया यांचे मार्बल जुने झाले होते. फ्लोरींग तसेच चावडीचा मुख्य भाग व व्हरांडा येथील जुने झालेले तंदूर स्टोन फ्लोरींग काढून टाकले आहे. त्या ठिकाणी नवीन प्युअर व्हाइट मकरांना मार्बलचे फ्लोरींग बसवण्यास व द्वारकामाई सभामंडपातील मार्बल फ्लोरींगला पॉलीश करण्यास साई मंदिर समितीने मान्यता दिली आहे. ही कामे चेन्नईचे साईभक्त के. व्ही. रमणी यांच्याकडून दिलेल्या देणगीतून करण्यात आले आहे.
त्यानुसार देणगीदार साईभक्त के. व्ही. रमणी व त्यांचे बंधू भास्करण यांनी मकरांसाठीचे हे मार्बल जयपूर येथून खरेदी करून संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे. सदरचे मार्बल जयपूर येथील साईभक्त विवेक चुर्तवेदी यांनी स्वःखर्चाने शिर्डी येथे पोहचवले आहे. तसेच या कामासाठी जयपूर येथील ३ कुशल कारागीर आवश्यक साहित्यांसह शिर्डी येथे पाठवले आहेत. तसेच या कामांसाठी आवश्यक असणारे इतर सर्व साहित्यही त्यांनी देणगी स्वरुपात दिले आहे. सदरच्या मार्बलला पॉलीश करण्यासाठी नाशिक येथील कारागीरांची व्यवस्थाही केली आहे. या कामांसाठी सुमारे ७ लाख रुपये चर्तुवेदी यांनी देणगी स्वरुपात खर्च केले असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.
द्वारकामाईतील कामाचा शुभारंभ १८ जुलैला होऊन २२ ऑगस्टला पूर्ण झाले. तर, गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली आहे. तसेच २५ ऑगस्टला चावडीतील मार्बल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. सदरचे काम पूर्ण होण्यासाठी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, उपअभियंता संजय जोरी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, यांनी परिश्रम घेतले.