अहमदनगर - जगभरातील करोडो भाविकांसाठी श्रद्धास्थानी असलेली साईबाबांची पवित्र उदी कोरोनाच्या संकटकाळात भाविकांच्या मदतीला निघाली आहे. स्थानिक शिवसेना पदाधिकारी व अनेक भाविकांच्या मागणीवरून साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भाविक व स्थानिक शिवसेनेच्या वतीने मागणी -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येऊ शकत नाही. यामुळे साईबाबांचा उदीच्या एका पाकिटासाठी भाविक आटापिटा करताना दिसतात. अनेकजण या उदीची पुडी अखंड सोबत बाळगतात. भाविकांसाठी मोठा आधार वाटणारी उदी कोरोनाच्या संकटकाळात त्यांना घरपोच उपलब्ध करून देण्याची मागणी भाविकांकडून होत होती. त्यातच स्थानिक शिवसेनेच्या वतीनेही ही मागणी करण्यात आली. यावर भाविकांच्या भावनांचा सन्मान करत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी भाविकांना पोस्टाने घरपोच उदी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा खर्च साईसंस्थान करणार आहे.
दोन लाख भाविकांना पाठवली घरपोच -
साईबाबांचा द्वारकामाईतील धुनीत रोज 60 ते 65 किलो उदी तयार होते. वर्षाला जवळपास 700 ते 800 गोण्या उदी तयार होते. यातून जवळपास दोन ग्रॅम वजन असलेले दोन कोटी उदी पाकिटे तयार करण्यात येतात. मंदिर सुरू असल्यावर प्रत्येक भाविकाला रांगेत एक पाकीट देण्यात येते. साईबाबांच्या शिर्डीत साजरे करण्यात येणारे गुरुपौर्णिमा, रामनवमी, पुण्यतिथी उत्सव काळात संस्थानचे सभासद असलेल्या जवळपास दोन लाख भाविकांना ही उदी घरपोच पाठवली जाते. यासाठी चारशे किलो उदी लागते.
संपर्क करा -
आता ज्या भाविकांना साईबाबांची उदी घरबसल्या आणि तीही मोफत पाहिजे असले तर अशा भाविकांनी साईसंस्थानची वेवसाइट www.sai.org.in तसेच व्हाट्सअॅप नंबर 9403825314 , saibaba@sai.org.in या मेल आयडीवर किंवा श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी या फेसबुक पेजवर भाविकांनी आपल्या पत्त्यासह उदीची मागणी नोंदवली तर त्यांना उदी पाठवण्यात येईल. गेल्या २४ तासात देशभरातील दीड हजार भाविकांनी उदीची मागणी नोंदवली असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.