शिर्डी(अहमदनगर) - साईबाबांच्या शतकोत्तरी पुण्यतिथी उत्सवाला आज सकाळी काकड आरतीपासून सुरुवात झाली आहे. रामनवमी, गुरूपौर्णिमा आणि गोकुळाष्टमी उत्सवाप्रमाणेच पुण्यतिथी उत्सवालाही कोरोनामुळे भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात जाऊन उत्सव साजरा करता येणार नसला तरी मंदिराबाहेरुन भक्त या उत्सवात सहभागी होत आहेत.
हेही वाचा - जीएसटी मोबदला: अखेर केंद्राकडून ६ हजार कोटी रुपये १६ राज्यांना वितरित
साईबाबांच्या शिर्डीतील पुण्यतिथी उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. यानंतर साई प्रतीमा, वीणा आणि साईसतचरित्राची साई समाधी मंदिर ते द्वारकामाईपर्यत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणाचे पठण करण्यात येऊन उत्सवाची सुरुवात करण्यात आली. मिरवणूक पुन्हा साई मंदिरात आल्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आले. मंगलस्नानानंतर साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते साईंची पाद्यपूजा करण्यात आली.
साईंबाबांच्या मूर्तीला सोन्याच्या अलंकाराचा साज -
साईंच्या मूर्तीला आज सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आले आहे. कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या दरम्यान रामनवमी, गुरूपौर्णिमा आणि गोकुळाष्टमी उत्सव झाले. मात्र, भाविकांना साई दर्शनासाठी मंदिरात जाता आले नाही. आता राज्यात अनलॉक सुरू झाले असून, साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला तरी मंदिरात जाऊन बाबांचे दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा साई भक्तांना होती. मात्र, राज्यात मंदिरं उघडण्याची परवानगी न मिळाल्याने भक्तांना प्रत्यक्षात मंदिरात जाता येत नसले तरी साई मंदिर परिसरात येत भक्त मंदिराच्या कलशाचे दर्शन घेत समाधान मानत आहेत.
साईबाबांचा यंदाचा वर्षी 102 वा पुण्यतिथी उत्सव असल्याने साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, साई मंदिराच्या आतील गाभाऱयात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.