शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Mahanirvan : 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डीत निंब वृक्षाखाली एक फकीर अवतरला. त्यांच्या वास्तव्याने या निंब वृक्षाच्या एका फांदीची पानेही गोड झाली. काही दिवसानंतर हा फकीर शिर्डीतून गायब झाला व पुन्हा धूपखेड्याच्या चांद पाटलाच्या वऱ्हाडातून शिर्डीत परतला. शिर्डीतील खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी या फकिराचे साई म्हणून स्वागत केले. तेव्हापासून त्यांना साई संबोधले जाऊ लागले. नंतरच्या काळात ते सगळ्या जगाचे साई झाले.
पडकी मशीद बनली साईंचे निवासस्थान : म्हाळसापतींनी साईची ओळख आपले मित्र काशीराम शिंपी व अप्पा जागले यांच्याशी करून दिली. या तिघांनी साईची एका पडक्या मशिदीत राहण्याची व्यवस्था केली. जिथं भटकी कुत्रीही फिरकत नसत, अशी ही जागा साफसूफ करून तेथे राहू लागले. त्यांनी तिथे धुनी पेटवली. ते या वास्तूला द्वारकामाई म्हणत. पायघोळ कफनी घालणारे व डोक्याला पांढरे कापड बांधणारे साई जवळजवळ सहा फुट उंच होते. भव्य कपाळ, वेध घेणारे डोळे, लांबसडक हात अशा दैवी दर्शनाने भाविकांचे डोळे व मन तृप्त करीत. जवळपास तीन ते चार तपे त्यांचे या द्वारकामाईत वास्तव्य घडले. या काळात त्यांनी पाण्याने दिवे लावले, अनेकांना व्याधी मुक्त केले, अशी आख्यायिका आहे. त्यांच्याकडे दूरदूरून भाविक येऊ लागले. साईबाबांनी आपल्या हयातीत कधी आपले नाव, जात, धर्म उघड केला नाही. ते हिंदूंना हिंदू तर मुस्लिमांना मुस्लीम वाटत. त्यांनी जगाला सबका मलिक एक व सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. साईचा प्रचार सर्वदूर झाला आणि शिर्डीत भाविकांचा ओघ वाढला. साठे, दीक्षित, बुटी आदी भाविकांनी भक्तांच्या सुविधेसाठी व निवासासाठी वाडे बांधले.
साईंचा देह समाधिस्त : विजयादशमी मंगळवार 15 ऑक्टोबर 1918 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबांनी द्वारकामाईत इहलोकीचा निरोप घेतला. निर्वाणापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई यांना नऊ रुपये दिले. मला वाड्यात घेऊन चला, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार गोपाळराव बुटींनी बांधलेल्या वाड्यात त्यांचा देह समाधिस्त करण्यात आला. आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी साईबाबांच्या समाधीला तारखेनुसार 105 वर्षे पूर्ण झाले आहेत.
साईबाबा पुण्यतिथी उत्सव : साईबाबांच्या महानिर्वाणाला तिथीनुसार 24 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी 105 वर्ष पूर्ण होत असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी 23 ते 26 ऑक्टोबर असा हा चार दिवसांचा साईबाबा पुण्यतिथी उत्सव साईबाबा संस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
हेही वाचा: