अहमदनगर - आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा परीक्षेचे नियोजन दिलेल्या 'न्यासा' संस्थेकडून गोंधळ उडाल्याची बाब समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोष 'न्यासा' या खाजगी संस्थेचा असला तरी या परिस्थितीत जनतेत सरकारबद्दल राग निर्माण होत असल्याने आमदार रोहित पवार यांनी याबाबतचे आपले मत व्यक्त करत अनेक मागण्या केल्या आहेत. याबाबत आमदार रोहित यांनी फेसबुक, ट्विटर वरून सरकारला धारेवर धरत मागण्या मांडत त्या तातडीने अंमलात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
![rohit pawar on nyasa recruitment on twitter handle](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13378179_rohit_pawar.png)
गोंधळ तातडीने मिटवा, आहे त्याच तारखेला परीक्षा घ्या -
आमदार रोहित पवार म्हणतात, एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.
विद्यार्थ्यांच्या मेहनत, आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका -
आमदार रोहित पवार यांनी उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा #MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती. या शब्दात आमदार रोहित यांनी तळतळ व्यक्त करत सरकार पुढे अपेक्षा मांडल्या आहेत.
हेही वाचा - चंद्रकांत दादा डोकं शांत ठेवून टिका करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पाठवले नवरत्न तेल