अहमदनगर - देश पातळीवर युपीए सरकारची मोट बांधण्याचे काम शरद पवार करत असल्यानेच मोदींनी त्यांना लक्ष केले आहे. असे मत रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांनी बोलताना व्यक्त केले. ते सद्या लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रचार दौरे करत आहेत.
रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष दिले असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे प्रचार दौरे सध्या सुरू आहेत. यावेळी पत्रकारांनी नरेंद्र मोदी आपल्या भाषणात शरद पवार यांना लक्ष करत आहेत, असे रोहित पवार यांना विचारले. तेव्हा रोहित पवार यांनी आपल्या आजोबांची बाजू सावरत मोदींकडे मुद्दे नसल्याने साहेबांना लक्ष करत असल्याचे सांगितले.
नगर दक्षिण लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळेल, असा विश्वासही रोहीत पवार यांनी बोलून दाखवला. जामखेड तालुक्याचा सकाळपासून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत दौरा केला. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावात कॉर्नर सभा झाल्या. या सभेत शेतकऱ्यांनी भाजप सरकारवर नाराजी व्यक्त केली आहेत. सध्याच्या सरकारने युवकांचा रोजगार हिरावून घेतला असल्याचेही रोहित पवार म्हणाले.
पालकाच्या मतदारसंघात पिण्यास पाणी नाही -
जलयुक्तचा गाजावाजा करणारे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट आहे. प्यायलाच पाणी नाही, तर शेतीला कोठून मिळणार, असा सवाल पवार यांनी विचारला आहे. तालुक्यात अनेक मुलभूत प्रश्न असताना यावर न बोलता शिंदे दुसर्याच्या भाषणाची टिंगल करण्यात व्यस्त आहेत. तसेच जनावरांच्या छावण्या पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनाच दिल्या जात असल्याचा आरोपही रोहित यांनी यावेळी केला.
सुजयवर अन्याय नाहीच -
दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा पाहिल्यापासून राष्ट्रवादीकडे आहे. या मतदारसंघात आमच्या पक्षाचा प्रभाव आहे व उमेदवार सक्षम आहे. त्यामुळे मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा प्रश्न येत नाही. विखे घराण्याला अनेक वर्षे मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, खासदारकी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारकी एवढे मिळाले तरी ते अन्याय झाला आहे, असे भावनीक आवाहन करून जनतेला फसवत आहेत. काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका करणारे आता त्यांचे गुणगान करत आहेत. जनतेने सुजय, आणि राधाकृष्ण विखे यांची खेळी समजून घ्यावी, असे आवाहन रोहित यांनी यावेळी केले.