अहमदनगर - शिर्डी जवळील राहाता शहरात एका विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. घटनेतील संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र प्रसारित; दोन दिवसात सव्वा दोन लाखांची घरफोडी
श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या देखील आल्या होत्या. कुलकर्णी विवाहस्थळी बसलेल्या असताना, त्यांच्या बहिणीने आपली पर्स त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिली. या पर्समध्ये 17 तोळे सोन्यासह दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल होता. कुलकर्णी यांनी ती पर्स शेजारील मोकळ्या खुर्चीवर ठेवली. त्या नातेवाईकांसोबत बोलत असल्याचा फायदा घेत चोरट्याने ही पर्स लांबवली. या प्रकरणी राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहाता पोलीस चोराचा शोध घेत आहेत.