शिर्डी - राहुरी येथील गोकुळ कॉलनी परिसरात लपलेल्या अट्टल दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. भिंतीचा आधार घेत पोलीस निरीक्षक मुकुंद गायकवाड यांच्या पथकाला दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे.
हेही वाचा - आता मुक्काम पोस्ट 'वर्षा'; लवकरच ठाकरे घेणार मुख्यमंत्री निवासस्थानाचा ताबा
सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील गोकुळ कॉलनी परिसरात दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. जवळपास पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ दरोडेखोर पोलिसांवर दगडफेक करत होते. या घटनेत पोलीस निरीक्षक मुकुंद गायकवाड यांच्या पथकाने भिंतीचा आधार घेत तीन जणांना पकडले असून अन्य दोघे पळून गेले आहेत. पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच दरोडेखोर हाती लागल्याने पुढील धोका टळला.
हेही वाचा - आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा
राहुरी येथील गोकुळ कॉलनीमध्ये दरोडा घालण्यासाठी सहा जण काटेरी झुडुपांच्या मागे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी पोलिसांच्या पथकावर दगडाचा मारा सुरू केला. दगडाचा मारा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी भिंतीचा आधार घेतला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच एकास पकडले. त्यानंतर पाठलाग करून अन्य तिघांनाही जेरबंद केले. पकडलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी, कात्री आणि दोन मोटारसायकलसह अन्य साहित्य जप्त केले आहे. दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असून ते संगमनेर, श्रीरामपूर भागातील असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - भारताचा जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतील सर्वात निचांकी स्तरावर
सागर गोरख मांजरे (रा.पाईपलाईन रोड, अहमनगर), अविनाश अजित नागपुरे (रा. भिंगार, तानगर), गणेश मारूती गायकवाड (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. राहुरी पोलिसांनी पकडलेल्या तीन दरोडेखोरांची चौकशी सुरू केली असून फरार झालेल्या दोन जणांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. हे सर्व दरोडेखोर सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.