अहमदनगर - प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानचा पायी पालखी दिंडी सोहळा वाजत-गाजत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. टाळ आणि मृदंगाच्या गजरात, मुखाने हरिनामाचा जयघोष करत, चोहीकडे भक्तीमय वातावरणात तल्लीन झालेले भाविक, अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
येऊनी कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरु नाथे !
हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी !!
यावेळी भजन, किर्तन आणि विठू नामाच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमुन गेला होता. सायंकाळी ५ वाजता संत निळोबारायांच्या पादुकांचे आणि पालखीचे पुजन करुन दिंडीचे प्रस्थान झाले.
पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी निळोबाराय महाराज संजीवनी समाधीचे पूजन देहू संस्थानचे आणि आळंदी संस्थानचे माणिक मोरे, रामदास मोरे, धनंजय महाराज, जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रस्थान प्रसंगी झालेल्या कीर्तन रुपी सेवेत भागवताचार्य हभप डॉ. विकासानंद निळकंठ महाराज मिसाळ यांनी पालखी सोहळ्यादरम्यान स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
यंदा निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याचे तिसरे वर्षे आहे. यावर्षी प्रथमच पालखी सोहळ्यात चांदीच्या पादुकांसाठी पालखी रथ तयार करण्यात आला आहे, अशी माहीती निळोबाराय महाराज देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव पठारे आणि कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी माहिती दिली.
प्रतिपंढरपूर म्हणून पिंपळनेरची ओळख
संत निळोबाराय यांनी संत नामदेवांना गुरुस्थानी मानले होते. संत नामदेवांवर त्यांनी १९०० अभंग रचले. तर, ३०० पेक्षा जास्त श्लोक शब्दबद्ध केले. साक्षात नामदेवांनी निळोबारायांना दृष्टांत दिल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे पिंपळनेरला प्रतिपंढरपूर मानले जाते. या पायी पालखी दिंडी सोहळ्यास शासनाची अधिकृत मान्यता असून पाणी, सुरक्षा, आरोग्य आदी सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत.