अहमदनगर - कुकडीच्या पाण्याचे आवर्तन अद्याप मिळाले नसल्याने कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, करमाळा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून यास आमदार रोहित पवार, कालवा सल्लागार समिती, प्रशासन यास जबाबदार असून पाणी सोडण्याबाबत आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने उभी पिके जळताना पहायची वेळ आली असल्याची टीका आणि खंत माजीमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
महिलेचा आक्रोश पाहून राम शिंदे गहिवरले -
राम शिंदे यांनी कर्जत तालुका दौरा करून कुकडी लाभक्षेत्रातील पाट-पाण्याची माहिती घेत पिकांची पाहणी केली. कुकडीच्या आवर्तनाची अत्यंत गरज असताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातुन पाणी सोडण्यास न्यायालयाकडून स्थगिती आणली गेली आहे. या पार्श्वभूमीवर कोळवडी इथे एका महिलेने पाण्याचे आवर्तन न मिळाल्याने ओढवलेल्या परिस्थितीचे गाऱ्हाणे शिंदे यांच्या समोर मांडले. यावेळी त्या महिलेला आपली हतबलता अनावर झाली आणि तिने राम शिंदे यांच्या समोर हाथ जोडून अश्रूंचा बांध मोकळा करून दिला. पाण्याअभावी पिके जळून जात आहेत. कोरोनामुळे दुधाला भाव राहिला नाही, जनावरे आजारी पडली म्हणून अंगावरील सोने विकून उपचार सुरू आहेत. आता वेळेत पाणी आले नाही तर आत्महत्या करायची वेळ आमच्यावर आल्याची व्यथा राधा संतोष फोंडे या महिलेने काकुळतीने मांडली. तिची व्यथा ऐकून स्वतः राम शिंदेसह उपस्थित गहिवरून गेले.
माझ्या काळात कधीही आवर्तन रोखले गेले नाही असे राम शिंदे यांनी सांगत या सरकारने जलयुक्त शिवाराची कामे बंद केली. मात्र आम्ही राबवलेल्या योजनेचा फायदा आतापर्यंत होत आला आहे. मात्र आता उन्हाळ्याचा काळ असल्याने आणि कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, करमाळा (जि. सोलापूर) या तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्राला पाण्याची गरज असताना राष्ट्रवादीचा पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ता न्यायालयात जाऊन आवर्तनाला स्थगिती मिळवत आहे. मुळात जानेवारी महिन्यातच पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित करायला पाहिजे होती. तहसीलदारांनी तसा प्रस्ताव दिला नाही. कालवा सल्लागार समितीत यावर चर्चा न झाल्याने इतिहासात पहिल्यांदा कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती मिळाली आहे. याला सर्वस्वी कालवा सल्लागार समिती आणि येथील आमदार रोहित पवार हे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. आता ही स्थगिती किमान मे महिन्यात तरी उठेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला रोहित पवार जबाबदार आहेत. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मते मांडायला रोज वेळ मिळत आहे. दुसऱ्या जिल्ह्यात रेमडेसिवीवर वाटायला वेळ मिळत आहेत, त्यांनी ते जरूर करावे पण आपल्या मतदारसंघातील रुग्णांची आणि शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्नांकडेही लक्ष द्यावे अशी अपेक्षा होती, मात्र हे होताना दिसत नसणे हे मोठे दुर्दैव्य असल्याचे शिंदे म्हणाले.