अहमदनगर - शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून रामजन्माचे स्वागत करण्यात आले. हा उत्सव अनुभवण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.
रामनवमीचा हा उत्सव साईबाबांच्या हयातीत सुरू झाल्याचे सांगण्यात येते. या उत्सवाला शिर्डीत १०७ वर्षांची परंपरा आहे. साईंच्या पश्चात साई संस्थान दरवर्षी मोठ्या उत्साहाने रामजन्मोत्सव साजरा करते. यावेळी शेकडो भाविक हजर राहून उत्सवात सहभाग घेतात.
साई मंदिर परिसरातील गुरुस्थानाजवळ रात्री १२ वाजता पाळणा हलवून रामजन्माचा उत्सव साजरा होतो. साईंचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. असंख्य दिव्यांच्या रोषनाईने मंदिर झगमगून जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहतात.