अहमदनगर - जिल्ह्यातील उत्तर भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला आहे. शनिवारी संगमनेर, राहूरी या तालुक्यात तडाखा दिल्यानंतर काल पुन्हा संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, या तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली
विजांच्या कडकडाटासह वादळी तडाखा
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, हरेगाव फाटा, निपाणी-वडगाव या परिसरात संध्याकाळी सात वाजता जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. यावेळी विजेचा कडकडाट होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसांच्या सरीबरोबर गारा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. परिसरात मोठे गव्हाचे क्षेत्र असून अनेक शेतकर्यांचे गहू पीक काढण्याचे शिल्लक आहे.
हेही वाचा - राज्यातील परिस्थितीचा आढावा राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे द्यावा; सुधीर मुनगंटीवार
शेतीचे नुकसान
अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे. तसेच केळी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. कोरोना संकटाने आधीच हैराण झालेल्या शेतकर्यांचे अवकाळीमुळे दुहेरी नुकसान झाले आहे. निपाणी-वडगाव वडाळा महादेव परिसरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतात महसूल विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.