अहमदनगर -
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मुंबईहून लोणीकडे परतताना अचानक संगमनेर शहरातील बस स्थानकाजवळ थांबून स्थानकाजवळील प्रसिद्ध येवले चहाचा आस्वाद घेतला. यावेळी विखे पाटलांसोबत अनेकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला, तर काही लोकांना स्वतः विखे यांनी चहाचे कप सर्व्ह केले. यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला.
राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद सर्वांना ज्ञात आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा विखे-पाटील यांनी थोरातांच्या गावात येऊन चहापाणी केल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना रंग चढला आहे. एका बाजूस राधाकृष्ण विखे-पाटील संगमनेर तालुक्यात येऊन चहापाणी घेतात, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी विखे विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात आणि विखेंचे चिरंजीव सुजय यांनी शिर्डी विमानतळावरून विमानात एकत्र दिल्लीवारी केल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
आता विखेंनी संगमनेरमध्ये चहापाणी घेतल्याने विखे - थोरात हे वाद फक्त जनतेसमोर आहेत का? अशा अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.