अहमदनगर - काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे आमदार बाळासाहेब थोरात हेच दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटी बाबतचे वृत्त हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत, असे विखेंनी या चर्चांनी पूर्णविराम लावला. तसेच या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती त्यांनी लोणी येथे दिली.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरू असून मला बदनाम करण्याचा काही जणांचा हेतू आहे, असे ते म्हणाले. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : 'वर्षा'तील ठाकरेंबाबतच्या 'त्या' मजकुराची चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना, काँग्रेसला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य असून त्यांना हे यश अपघाताने मिळाले आहे, अशी टीका विखे यांनी केली. मी विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' आल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात काँग्रेसचा पूर्णपणे फुटबॉल झाला असून पक्षाचे नेतृत्व राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधलेले असल्याची टीका विखे यांनी केली आहे.