अहमदनगर - पोलिसांच्या मदतीने नवा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीकडून सुरू असलेला हा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा भाजपाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
महाड न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन दिल्याने सरकार तोंडावर पडले आहे. एकप्रकारे न्यायालयाने सरकारच्या कानशिलात मारली, असा चिमटाही विखे यांनी काढला. नारायण राणे यांना आघाडी सरकारने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 25 ऑगस्ट) शिर्डीत जोरदार निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकारचा निषेध व राणे यांना पाठिंबा दर्शवणारे फलक आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, रविंद्र गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, पोपटराव शिंदे, ताराचंद कोते, नितीन कोते, अॅड. रघुनाथ बोठे, बाबासाहेब डांगे, बाळासाहेब गाडेकर, भाऊसाहेब जेजुरकर, बाळासाहेब जपे आदींची यावेळी उपस्थीती होती.
करण्यात आल्या विविध मागण्या
यापूर्वी पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली. पण, तुमच्यावर कोणी गुन्हे दाखल केले नाहीत. पण, आता तुमच्याकडून झालेली टीका आणि दसरा मेळाव्यातील भाषणाच्या जुन्या रेकॉर्ड काढून कारवाई करण्याची मागणी आम्हाला करावीच लागेल, असा इशारा शिवसेनेला आमदार विखे पाटील यांनी दिला. तसेच राणे यांच्या अटकेची चौकशी करुन संबधितांवर कारवाई करावी. सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निलंबित करा
गृह विभागातील राजकीय हस्तक्षेप वाढत असून फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम या विभागात सुरू आहेत. अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्याची वेळ आता आली आहे, असा परखड इशारा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी ज्या पध्दतीने अटकेची कार्यवाही केली ते पाहता आधिकारीही आता राज्यकर्त्यांच्या दबावात काम करू लागले आहेत, असे दिसते. नियमांच्या बाहेर जाऊन केलेल्या या कृतीबद्दल आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - रक्षाबंधन करून सासरी जात होती नवविवाहिता, अपघातात झाला मृत्यू