शिर्डी (अहमदनगर) : 'इस्रो'चे 'चांद्रयान 3' सध्या चंद्राच्या कक्षेत आहे. ते 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. 2019 मध्ये इस्रोची चांद्रयान 2 मोहीम फेल झाली होती. तेव्हा चांद्रयान सॉफ्ट लॅंडिंगदरम्यान अति वेगामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाले होते. त्यामुळे आता 'चांद्रयान 3' मोहिमेकडून देशवासीयांना फार मोठ्या अपेक्षा आहेत.
'चांद्रयान 3' च्या प्रतिमेचे पूजन केले : या पार्श्वभूमीवर आता चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शिर्डीत साईभक्त आणि ग्रामस्थांनी साईंना साकडं घातलंय. भक्तांनी साईबाबांच्या व्दारकामाईसमोर चांद्रयान 3 च्या प्रतिमेचं पूजन करत साईंना प्रार्थना केलीये. चांद्रयानासाठी पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे आता या मोहिमेला विज्ञानाबरोबरच भक्तीचा देखील जोड साई दरबारी देण्यात आलाय.
ग्रामस्थांबरोबर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती : शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबांच्या व्दारकामाईसमोर चांद्रयान 3 च्या प्रतिमाचे पूजन करत साईबाबांची 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती गायली. दरम्यान साई भक्तांनी हातात राष्ट्रध्वज घेत 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या आणि चांद्रयान चंद्रावर सुखरुप उतरावे यासाठी साकडं घातलं. यावेळी शिर्डी ग्रामस्थांबरोबरच भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
23 ऑगस्टला सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल : चांद्रयान 3 चे १४ जुलै २०२३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले होते. यानाने ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. ते 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.45 च्या सुमारास चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. जर हे लॅंडिंग यशस्वी झाले तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल.
रशियाचे लुना 25 क्रॅश झाले : यापूर्वी रशिया आणि चीनने आपले यान चंद्रावर उतरवले आहे. मात्र या दोन्ही देशांचे यान चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरले होते. यावर्षीं भारताच्या चांद्रयानापूर्वी रशियाच्या लुना 25 या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र 20 ऑगस्टला हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाले. तांत्रिक बिघाडामुळे हे यान क्रॅश झाल्याचे रशियाच्या स्पेस एजन्सीने सांगितले. त्यामुळे आता भारताच्या चांद्रयान 3 कडे सर्वाचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा :