अहमदनगर- साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने यावर्षी १५ ते १७ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये ४ कोटी ५२ लाख इतकी देणगी प्राप्त झाली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.
१५ ते १७ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण रुपये ४ कोटी ५२ लाख देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दक्षिणापेटीत रुपये २ कोटी १२ लाख ९९ हजार १५८, देणगी काऊंटर १ कोटी ७ लाख ३ हजार ३५१ रुपये जमा झाले. डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाईन,चेक-डी.डी., मनी ऑर्डर देणगी आदीव्दारे रुपये १ कोटी ३ लाख ८ हजार १८० रुपये तर सोने ६४५.०१५ ग्रॅम जमा झाले याचे मूल्य रुपये १८ लाख ८७ हजार एवढे होते आणि चांदी ५०३२ ग्रॅम जमा झाली याचे मूल्य रुपये १ लाख ३० हजार जमा झाले. १७ देशांचे परकिय चलन ८ लाख ९४ हजार ४४४.५० एवढ्या किमतीचे जमा झाले,असे मुगळीकर यांनी सांगितले.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत १ लाख ८६ हजार७८३ साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन आरती पासेस व्दारे ६७ लाख ४५ हजार रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच उत्सव कालावधीमध्ये साई प्रसादालयामध्ये २ लाख ५४१ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेतुन २ लाख १० हजार ४०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले.
या कालावधीत १ लाख ७८ हजार १४६ प्रसादरुपी लाडू पाकीटांची विक्री करण्यात आली. तसेच श्री साईप्रसाद निवासस्थान,साईबाबा भक्तनिवासस्थान,व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा येथे ४९ हजार ५५४ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सुमारे ०५ हजार ८१९ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच साईधर्मशाळा येथे ४० पालख्यांची निवास व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.