अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना नागरिकांनी घरामध्ये थांबणे अत्यावश्यक आहे. पोलिसांनी नगर शहराच्या विविध भागात पथसंचलन करत नागरिकांना शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. नगर शहरामध्ये एकूण 26 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
अशी परिस्थिती असतानाही काही नागरिक अनावश्यकपणे रस्त्यावर येत आहेत आणि शासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडवत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये पोलिसांनी पथसंचलन करत नागरिकांना घरामध्ये थांबण्याचे आणि आरोग्य विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
शासन-प्रशासन नागरिकांना घरामध्ये थांबून आरामात राहण्याचे आवाहन करत आहे. पोलीस, आरोग्य विभाग आणि इतर सेवाभावी संस्था सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत. याचीच जाणीव ठेवत नागरिकांनी पथसंचलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंग ठेवत टाळ्या वाजवून पोलिसांचे कौतुक केले. काही ठिकाणी महिलांना पोलिसांचे औक्षण केले.
नागरिकांनी शासन, प्रशासन आणि आरोग्य विभाग देत असलेल्या सूचना पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य जनता लॉकडाऊनला निश्चितच वैतागली आहे. मात्र, तरीही यातून सुटका हवी असेल तर, दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.