अहमदनगर - मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने, धरणे तर काही ठिकाणी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आता आक्रमक पवित्रा घेत सत्तार तुम्ही नगर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात आले तरी तुमचा मी बंदोबस्त करतो अशी थेट धमकीच दिली आहे.
पोलीस बंदोबस्तात आला तरी मी बंदोबस्त करतो - या टिकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच चिडले असून राज्यभर विविध ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनीही सत्तारांच्या वक्तव्याचा समाचार घेत नगर जिल्ह्यात येऊनच दाखवा असे खुले आव्हान देत तुम्हाला जिल्ह्यातून पुढे जाऊ दिले जाणार नाही, असा दमच भरला आहे. आ.लंके जसे विविध सामाजिक कार्याबद्दल प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या आक्रमक कार्यपद्धतीबद्दलही प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी यावेळी आक्रमक पद्धतीने आपली प्रतिक्रिया देत सत्तारांना आव्हान दिले आहे. जरी तुम्ही मंत्री असलात आणि पोलीस बंदोबस्तात फिरत असताल तरी या फौजफाट्यात तुम्हाला आमच्या पद्धतीने अडवून जिल्ह्यातून पुढे कसे जातात ते पाहू असा इशारा त्यांनी दिला आहे.
आज पारनेर तहसीलवर धडक मोर्चा - लंकेनी सत्तारांचा एकरी भाषेत उल्लेख करत खासदार सुळेंवरील त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, एकीकडे अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांची स्पष्ट शब्दात जाहीर माफी अजून मागितली नाही. तसेच, सत्तारांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना मंत्रीपदावरून हटवावे या मागणीसाठी आज मंगळवारी पारनेर तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.