अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी एका ५० वर्षीय व्यक्तीचा अहवाल आज सोमवारी प्राप्त झाला. यामध्ये तो व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कोरोनाबाधित व्यक्ती नेवासे शहरातील असून त्याला सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी या व्यक्तीचा एक्स-रे काढण्यात आला होता. त्यात या व्यक्तीला न्यूमोनिया झाल्याचे तसेच सारीसदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर आज सकाळी या व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचा समोर आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 1123 व्यक्तींच्या घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 1 हजार 16 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या 73 अहवालांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये एकूण 28 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये बीड येथील आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती आणि मूळची श्रीरामपूर तालुक्यातील परंतू ससूनमध्ये उपचार घेणारी अशा 2 व्यक्तींचा समावेश आहे. ससूनमध्ये उपचार घेणार्या व्यक्तीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचीही माहिती मुरंबीकर यांनी दिली आहे.
तर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली 76 जणांना ठेवण्यात आले आहे. तसेच 449 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 679 जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुरंबीकर यांनी दिली.